महत्वाच्या बातम्या

 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थी सर्व्हेक्षण


- माहिती घेण्यासाठी येणा-या प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावणे हे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात. 

महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण, योजनांचे परिणाम, मूल्यांकन करण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी शासनस्तरावरून प्रीमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलमेंट कन्सल्टंट प्रा. लिमि. या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश महामंडळाच्या विविध योजनांअंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची सद्यस्थिती जाणून घेणे, कर्जाचा वापर कोणत्या व्यवसायासाठी करण्यात आला आहे, लाभार्थ्यांच्या व्यवसायाची सद्यस्थिती, रोजगार व उत्पन्नामध्ये झालेली वाढ, योजनांचा लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर झालेला परिणाम तसेच कर्ज परतफेडीची सद्यस्थिती याबाबत माहिती संकलित करणे हा आहे.

सदर सर्वेक्षणामध्ये महामंडळाच्या विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आवश्यक माहिती संकलित करण्यात येणार आहे. तसेच कर्ज वितरणानंतर लाभार्थ्यांना व्यवसायामध्ये येणा-या अडचणी, व्यवसायाची प्रगती व योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. तरी महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नियुक्त प्रतिनिर्धीना आवश्यक ती माहिती व सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे. सदर सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे महामंडळाच्या योजनांची परिणामकारकता वाढविणे, भविष्यातील योजनांचे नियोजन अधिक प्रभावी करणे तसेच लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे, असे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.





  Print






Related Photos