महत्वाच्या बातम्या

 जात पडताळणी विशेष त्रुटी पुर्तता शिबीराचे आयोजन सेवा संकल्प अभियानांतर्गत पडताळणी समितीचा उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (मराठा) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विशेष त्रुटी पूर्तता शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शैक्षणिक प्रयोजनासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये काही आवश्यक कागदपत्रे, पुरावे अथवा इतर बाबींची पूर्तता आवश्यक असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करून त्रुटींची पूर्तता करण्याची सुविधा या विशेष शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये आरक्षित प्रवर्गातुन व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. शासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये आरक्षित जागेवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विशेष बाब म्हणुन प्रवेश घेतल्यापासुन तीन महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये आरक्षित जागेवर प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरणे सादर केलेली आहे, परंतू प्रकरणांतील त्रुटीमुळे ज्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (मराठा) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सेवा संकल्प अभियांनांतर्गत १७ ऑक्टोंबरपर्यंत विशेष त्रुटी पुर्तता शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता मिळालेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी या शिबिरांमध्ये स्वतः अथवा पालकांमार्फत त्रुटींची पुर्तता करावी. या कालावधीत विद्यार्थी अथवा पालकांना कोणत्याही पुर्वसूचनेशिवाय समिती समोर उपस्थिती राहुन पुर्तता करता येईल, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य जया राऊत व संशोधन अधिकारी अंकेश केदार यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos