प्रेमसंबंधातील वादातून महिलेची गळा दाबून हत्या : मृतदेह नागपूर जिल्ह्यात पुरला, आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे पर्यवसान महिलेच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. ४५ वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे नेऊन पुरण्यात आला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी तुकूम येथील आरोपी संतोष साखरकर ४९ वर्ष याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संतोष साखरकर याचे संबंधित महिलेसोबत मागील तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपी संतोष साखरकर याने महिलेचा गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर हत्येचा गुन्हा उघडकीस येऊ नये आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने त्याने महिलेचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे नेऊन दफन केला.
दरम्यान, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी संतोष साखरकर हा स्वतः चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घटनेची माहिती दिली. या माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस पथकाने नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे घटनास्थळी भेट दिली. कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जमिनीत पुरलेला महिलेचा मृतदेह उत्खनन करून बाहेर काढण्यात आला.
मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सहारे, पोलीस हवालदार राकेश फुकट, पोलीस अंमलदार मोरेश्वर शिंदे, रोशन भोईंकर आणि लीना काटवले यांनी केले.




Petrol Price




