कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन कारची चाके चोरली : रामनगर पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाला घेतले ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वतःची कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन कारची चार-चार चाके अलॉयव्हीलसह चोरण्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये उघडकीस आला आहे. कार खरेदीसाठी कमी पडणारे पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने हवेली गार्डन परिसरातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. रामनगर पोलिसांनी त्याला पालकांसमक्ष ताब्यात घेत दोन्ही गुन्ह्यांची उकल केली असून, एकूण १ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२१ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजेपासून २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत नागपूर रोडवरील गॅरेजसमोर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या भूषण नारायणराव गवांडे यांच्या मारुती सुझुकी ब्रेझा कारचे चारही टायर अलॉयव्हीलसह काढून नेण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच परिसरातील कुंदन प्लाझा चौकातील ए. वन कार वॉशिंग सेंटरसमोर उभ्या असलेल्या बलेनो कारचेही चारही टायर अलॉयव्हीलसह चोरीला गेले होते. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १२३२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच परिसरात दोन कारची चाके चोरीला गेल्याने पोलिसांसमोर चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान होते.
रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी कसून शोध घेतला असता, कार घेण्यासाठी कमी पडणारी रक्कम जमविण्याच्या उद्देशाने संबंधित बालकाने दोन्ही कारची चाके चोरून विकण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या पालकांसमक्ष ताब्यात घेतले.
या कारवाईत चोरीची आठ टायर अलॉयव्हीलसह, गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा जॅक असा एकूण १ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे रामनगर पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे तसेच पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार डेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सूरज शेडमाके आणि ब्ल्युटी साखरे यांनी केली.




Petrol Price




