शेतातील धानपिकाला पाणी देऊन परतताना काळाचा घाला : भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी येथील रहिवासी हरिदास चंदनखेड़े यांच्यावर शेतातील काम आटोपून घरी परतताना काळाने घाला घातला. तळोधी-नागभीड मार्गावरील गोविंदपूर फाट्याजवळ भरधाव कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६२ वर्षीय हरिदास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शेतातील धानपिकाला पाणी देऊन सुखरूप घरी परतण्याची अपेक्षा असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तळोधी येथील रहिवासी हरिदास चंदनखेड़े हे १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता धानपिकाला पाणी देण्यासाठी सायकलने शेताकडे गेले होते. शेतातील काम पूर्ण करून ते घरी परतत असताना तळोधीहून नागभीडच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारने (क्रमांक एमएच ३३ व्ही १७९७) त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
धडक इतकी भीषण होती की हरिदास यांची सायकल क्षतिग्रस्त झाली, तर कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हरिदास यांचे पुत्र पिटू चंदनखेड़े घटनास्थळी पोहोचले. वडिलांच्या मृत्यूच्या वृत्ताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पिटू चंदनखेड़े यांनी तळोधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वडसा, जिल्हा गडचिरोली येथील कारचालक तुषार संजय मैंद (वय ३२) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तळोधी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.




Petrol Price




