घराला कुलूप लावून मुंबईला जाणे महागात : बाबुपेठेत घरफोडी, १ लाख ५४ हजारांचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : घराला कुलूप लावून कुटुंबासह मुंबईला गेलेल्या महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची गंभीर घटना बाबुपेठ परिसरात उघडकीस आली आहे. या घरफोडीत तब्बल १ लाख ५४ हजार ३०० रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भावना बादल उमरे ३४ वर्ष , रा. समता चौक, तक्षशिला विहाराजवळ, बाबुपेठ, चंद्रपूर या कुटुंबासह राहतात. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्या पती आणि मुलांसह घराला कुलूप लावून मुंबई येथे फिरण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांच्या बहिणीचा फोन आला. घराच्या दरवाजाला कुलूप नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर उमरे यांनी आपण रेल्वेने परत येत असल्याचे सांगून घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले.
१६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्या पतीसह घरी परतल्या असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील कपाट उघडे होते. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते, तर आतील लॉकरही उघडे होते. लॉकरमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यातील सोन्या-चांदीचे सर्व दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने सोन्याचे पदक, सोन्याच्या मण्यांच्या माळा, झुमके, गोफ, धम्मचक्र असलेली जीवती, विविध सोन्याच्या अंगठ्या, कानातील टॉप्स तसेच चांदीची साखळी आणि जोडवे असा एकूण १ लाख ५४ हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कपाटाचे लॉक तोडून चोरट्याने चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.




Petrol Price




