महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे ३.४४ लाखांचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर बसस्थानकावर गडचिरोलीला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील तब्बल ३ लाख ४४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कल्पना राजू बल्लेरवार (वय ५४), रा. भद्रावती यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कल्पना बल्लेरवार या १५ नोव्हेंबर रोजी पती राजू बल्लेरवार यांच्यासोबत भाऊबीज सणासाठी गडचिरोली येथे जाण्यास निघाल्या होत्या. घरात कोणीही नसल्याने त्यांनी स्वतःचे व पतीचे सोन्या-चांदीचे दागिने एका पर्समध्ये ठेवले होते. भद्रावती येथून गडचिरोलीला जाण्यास थेट बस उपलब्ध नसल्याने त्यांनी नागपूर-चंद्रपूर बसने चंद्रपूर गाठले. बसस्थानकावर उतरल्यावर पर्समधील दागिने सुरक्षित असल्याची खात्रीही त्यांनी केली होती.

दुपारी सुमारे १.५० वाजताच्या सुमारास गडचिरोलीला जाणारी बस आल्यानंतर पती-पत्नी बसमध्ये चढू लागले. यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. बसमध्ये चढल्यानंतर कल्पना यांनी पर्स तपासली असता त्यातील दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पतीसह बसमधून खाली उतरून शोध घेतला; मात्र दागिने मिळून आले नाहीत.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या दोन जोड रिंगा, सहा व पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाची सोन्याची गोफ तसेच चांदीचे जोडवे व चाळ यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत ३ लाख ४४ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, बसमधील गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या अज्ञात चोरट्याचा रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत आहेत.





  Print






Related Photos