महत्वाच्या बातम्या

 डाक सेवांबाबत तक्रारींच्या निवारणासाठी १ ऑक्टोबरला डाक अदालत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : नागरिकांना दर्जेदार डाक सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण करण्याच्या उद्देशाने अधीक्षक डाकघर, वर्धा विभाग, वर्धा यांच्या कार्यालयात १ऑक्टोबर सकाळी ११वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

डाक सेवेबाबत प्राप्त तक्रारींचे तीन आठवड्यांच्या आत निवारण झाले नसल्यास किंवा तक्रारीवर समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नसल्यास अशा तक्रारी डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, डाकवस्तू पार्सल, बचत बँक तसेच मनीऑर्डर यासंबंधीच्या तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे.

तक्रारीमध्ये संबंधित प्रकरणाचा संपूर्ण तपशील, तक्रारीची तारीख तसेच ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार पाठविण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्याचे नाव व इतर आवश्यक माहिती नमूद करावी. संबंधित नागरिकांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतींसह अधीक्षक डाकघर, वर्धा विभाग, वर्धा यांच्या कार्यालयात, पहिला माळा, वर्धा - ४४२००१ या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अथवा त्यापूर्वी सादर करावी.

डाक अदालतीमध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे डाक सेवांशी संबंधित प्रलंबित तक्रारी असलेल्या नागरिकांनी या डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, वर्धा विभाग, वर्धा यांनी केले आहे.





  Print






Related Photos