गडचिरोलीत आज रंगणार आदिवासी कला-संस्कृतीचा भव्य सोहळा


- भगवान बिरसा कला संगम २.० मुख्य आकर्षण; मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन, केंद्रीय मंत्री जुएल ओराम व अभिनेते भरत गणेशपुरे यांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरांचा भव्य सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ हा विशेष कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम आणि प्रसिद्ध विनोदी अभिनेते भरत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या महोत्सवात पारंपरिक आदिवासी नृत्य, लोकगायन, वाद्य वादन, चित्रकला, हस्तकला, डिजिटल कलाविष्कार तसेच आदिवासी समाजाच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरांचे प्रदर्शन होणार आहे. भगवान बिरसा मुंडा आणि वीरांगना राणी दुर्गावती यांच्या शौर्यगाथांचे नाट्यमय सादरीकरणही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
महोत्सवातील पारंपरिक कला सादरीकरणातून आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले नाते, जीवनशैली, सण-उत्सव आणि लोकपरंपरांचे दर्शन घडणार आहे. यासोबतच रील्स, ब्लॉग्स, व्ह्लॉग्स, फोटोग्राफी, लघुपट, माहितीपट आणि पोस्टर सादरीकरण अशा डिजिटल स्पर्धांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीला आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित विशेष प्रदर्शनात आदिवासी देव-देवता, पूजाविधी, विवाह व अंत्यसंस्कार पद्धती, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक परंपरांची माहिती मांडण्यात येणार आहे. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित नाटिका आणि वनगर्जना स्टोरी ऑफ राणी दुर्गावती’ या विशेष नाट्यप्रयोगातून आदिवासी महापुरुषांचा त्याग, शौर्य आणि स्वाभिमानाचा इतिहास उलगडणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील एवढ्या व्यापक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन होत असून राज्याच्या विविध भागांतील आदिवासी कलाकार, विद्यार्थी आणि नवोदित कलावंत सहभागी होणार आहेत. आदिवासी कला व संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासोबतच स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या आयोजनाचा उद्देश आहे.
दरम्यान, रविवार, १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ९ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी नागरिक, विद्यार्थी, युवक आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




Petrol Price




