जुनोना जंगलात वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय मजुराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलात वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कलमसिंह पंचमसिंह उईके (वय ६५, रा. खापा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. बांबू कटाईच्या कामासाठी जंगलात गेलेले कलमसिंह मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. बुधवारी सकाळी शोधमोहीम राबविताना त्यांचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कलमसिंह उईके हे जंगल ठेकेदार सुखविंदरसिंग भोये यांच्याकडे बांबू कटाईचे काम करण्यासाठी आले होते. २७ ऑक्टोबर रोजी ते अन्य मजुरांसोबत जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलातील कक्ष क्रमांक ४६० मध्ये बांबूंचे बंडल बांधण्यासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास इतर मजूर परतले; मात्र कलमसिंह परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. रात्र होऊनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही.
बुधवारी सकाळपासून सहकारी मजुरांनी जंगल परिसरात त्यांचा शोध सुरू केला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले.
घटनेची माहिती एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावरून पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदेश वाघमारे, मोहन निषाद, पोलीस अंमलदार अंकुश बुरांडे आणि कैलास आडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविला.
या घटनेमुळे गिलबिली जंगल परिसरात काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगलात काम करताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.




Petrol Price




