महत्वाच्या बातम्या

 नागरिकांच्या बाप्पाला निरोप देताना पोलिसांचा बाप्पा राहिला प्रतीक्षेत : ढोल-ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : घराघरांत आरतीचे स्वर घुमत असताना, गणरायाच्या मिरवणुका उत्साहात निघत असताना बल्लारपूर पोलीस मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. घरच्या बाप्पाची आरती, कुटुंबीयांसोबतचा उत्सव आणि विसर्जनाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी दिवसरात्र बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. गणपती विसर्जनाच्या दिवशी सकाळी ९ वाजताच पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी घराबाहेर पडले. दिवसभर गर्दीच्या ठिकाणी, विसर्जन मिरवणुकांमध्ये आणि विसर्जनस्थळी तैनात राहून त्यांनी नागरिकांची सुरक्षितता सांभाळली. अनेक तास उभे राहून ड्युटी करताना बसण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नव्हती. विसर्जनाचा बंदोबस्त संपेपर्यंत रात्र झाली आणि काही कर्मचारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचले.

मात्र, विश्रांतीचे काही तास संपताच पुन्हा सकाळी कामगिरीवर हजर व्हावे लागले. त्यानंतर पुन्हा दिवसभर बंदोबस्त आणि रात्री दोन-तीन वाजेपर्यंत ड्युटी, अशी सलग धावपळ सुरू होती. त्यामुळे अनेक पोलिसांना आपल्या कुटुंबीयांसोबत बाप्पाचे विसर्जन पाहण्याचीही संधी मिळाली नाही. अखेर बल्लारपूर पोलीस ठाण्यात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या गणरायाच्या विसर्जनाची वेळ आली. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महिला कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी झाले. विशेष म्हणजे सर्वांनी पारंपरिक पोशाख परिधान करून डोक्यावर आकर्षक पगड्या बांधल्या होत्या.

ढोल-ताशांचा गजर सुरू झाला... लेझीमचा ताल धरला गेला... आणि दिवसभराचा थकवा क्षणात दूर झाला. पारंपरिक वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी लेझीम खेळत उत्साहात सहभाग घेतला. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. दिवसभर नागरिकांच्या गणरायाच्या विसर्जनाची व्यवस्था सांभाळणारे पोलीस यावेळी आपल्या बाप्पासोबत होते. कर्तव्याच्या धावपळीत घरच्या आरतीलाही हजेरी लावता आली नाही, मात्र अखेर आपल्या गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि पारंपरिक वेशात भावपूर्ण निरोप देण्याचा आनंद त्यांच्या वाट्याला आला.

वर्दीतील कर्तव्याच्या मागेही एक संवेदनशील मन असते, एक कुटुंब असते आणि त्या कुटुंबाचाही बाप्पा असतो. नागरिकांचा उत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून स्वतःचा उत्सव बाजूला ठेवणाऱ्या बल्लारपूर पोलिसांचा हा गणेशोत्सवातील त्याग आणि भावनिक क्षण उपस्थितांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.





  Print






Related Photos