मनीषनगरमध्ये कारच्या धडकेत तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू : आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगर परिसरात भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
मृत चिमुकल्याचे नाव श्रेयांश पंकज आष्टणकर ३ वर्षे असे आहे. ही दुर्घटना सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास मनीषनगर येथील आश्रय सोसायटी परिसरात घडली.
प्राथमिक माहितीनुसार, श्रेयांश हा आपल्या वडिलांच्या दुकानाबाहेर खेळत होता. खेळता-खेळता तो अचानक रस्त्यावर आला. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत श्रेयांश गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कुटुंबीयांनी तत्काळ श्रेयांशला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मेडिकल हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर श्रेयांशला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताचे नेमके कारण आणि चालकाचा वेग याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे मनीषनगर परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी निवासी भागात वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी केली आहे.
News - Nagpur




Petrol Price




