कत्तलीसाठी नेली जाणारी ९ गोवंश जनावरे मुक्त; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त : मुल पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यु एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकापूर एमआयडीसी रोड परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मूल पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली. या कारवाईत ९ गोवंश जनावरे, एक मालवाहू वाहन व मोबाईल असा एकूण ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज, सोमवार ६ जुलै रोजी पहाटे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभरे हे पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे व सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना सावलीहून मूलकडे परत येत होते. त्यावेळी आकापूर एमआयडीसी रोड ते उमा नदी टी-पॉईंटदरम्यान संशयास्पदरीत्या भरधाव जाणारे अशोक लेलँड छोटा हत्ती क्रमांक एमएच २७ डीटी १३२० हे वाहन अडवून त्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनात कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता ९ गोवंश जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून बांधल्याचे आढळून आले. प्राथमिक चौकशीत आर्थिक फायद्यासाठी या जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच चालकाकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भूषण तिरुपती जम्मलवार ३१ वर्ष रा. मेंढे हाऊस, पंचशील चौक, बजाज बालवाडीजवळ, चंद्रपूर याला अटक केली.
कारवाईदरम्यान ९ गोवंश जनावरे (एक बैल, दोन गायी व सहा कालवडी) अंदाजे ६७ हजार रुपये, अशोक लेलँड छोटा हत्ती वाहन ४ लाख रुपये तसेच ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत ८ हजार रुपये असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ चे कलम ९, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(अ), (ड), (ई), (एफ) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ अन्वये मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभरे, पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे व त्यांच्या पथकाने केली.
News - Chandrapur




Petrol Price




