चंद्रपूरकरांना ताडोबा सफारित सवलत द्या : आ. किशोर जोरगेवार
- ताडोबा महोत्सवाच्या मंचावरुन आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा सफारीचे दर पहाता स्थानिकांना सफारी करिता परवडणारे नाही. परिणामी येथील वाघांचे आणि जंगलाचे संरक्षण करणाऱ्या स्थानिकांना ताडोबाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे ताडोबा सफारीत स्थानिकांना सवलत द्या, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
वन विभागाच्या वतीने ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान तिन दिवसीय या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी बोलतांना त्यांनी सदर मागणी केली आहे. यावेळी वन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आदींची उपस्थिती होती.
वन विभागाच्या वतीने आयोजित ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगप्रसिध्द कवी डॉ. कुमार विश्वास यांनी कार्यक्रमात रंगत भरली. या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आपण अधिवेशनात स्थानिक नागरिकांना ताडोबा सफारीत सवलत देण्यात यावी. अशी मागणी केली आहे. पुन्हा आपण ही मागणी या ठिकाणी करत असल्याचे ते म्हणाले. येथील नागरिकांनाही ताडोबातील वाघ पाहता यावे या करिता हे आवश्यक असून येथील नागरिकांना ताडोबा सफारीत सवलत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी ताडोबा महोत्सवाच्या मंचावरुन केली आहे.
News - Chandrapur