समाज भवन समाजाच्या उन्नतीचे प्रभावी माध्यम : आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम


- अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मुस्लिम समाजासाठी विविध विकासकामांचे लोकार्पण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : समाज भवन हे समाजाच्या उन्नतीचे, एकात्मतेचे आणि सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे. समाज भवनातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध विधायक उपक्रमांना चालना मिळते. समाजाच्या प्रगतीची जडणघडण अशा समाज भवनांमधूनच होत असते, असे प्रतिपादन आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या समाज भवन, ईदगाह संरक्षण भिंत, टिन शेड तसेच सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यापूर्वी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते फित कापून समाज भवनासह विविध विकासकामांचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रविंद्रबाबा आत्राम होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, जामा मस्जिद कमिटीचे माजी अध्यक्ष दिलदार सैय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, राजेश्वर रांगुलवार, इरफान पठाण, इसाक, शफीक शेख, रफिक भाई यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, समाजाचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय असून प्रत्येक समाजघटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विधायक कार्य आणि लोकहिताच्या विकासकामांसाठी आपण नेहमीच तत्पर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी लोकार्पण करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत या सुविधांमुळे मुस्लिम समाजातील नागरिकांना सामाजिक, धार्मिक आणि सामुदायिक कार्यक्रमांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच परिसराच्या विकासालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांनी केले. त्यांनी विकासकामांसाठी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले.
या लोकार्पण सोहळ्यास मुस्लिम समाजातील मोठ्या संख्येने समाजबांधव, प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. नव्याने उभारण्यात आलेल्या विकासकामांमुळे समाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून सामाजिक व धार्मिक उपक्रमांना नवे बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
News - Gadchiroli




Petrol Price




