गडचिरोलीत बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड, नागपुरातील फ्लॅटमध्ये सुरू होती बनावट नोटा छापण्याची फॅक्टरी : दोन सख्ख्या भावांसह चार आरोपी अटकेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये जमा करण्यात आलेल्या संशयित नोटांच्या प्रकरणातून बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपुरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याच्या फॅक्टरीवर धाड टाकण्यात आली. या प्रकरणात दोन उच्चशिक्षित सख्ख्या भावांसह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये जमा करण्यात आलेल्या काही नोटांवर संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपुरातील एका फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा, उच्च दर्जाचे प्रिंटर, विशेष प्रकारचा कागद तसेच नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.
प्राथमिक तपासात आरोपी मागील काही काळापासून बनावट नोटांची छपाई करून त्या बाजारात चलनात आणण्याचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे इतर जिल्हे आणि राज्यांपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने तपास वेगाने सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन सख्खे भाऊ उच्चशिक्षित असून त्यांनी तांत्रिक ज्ञानाचा वापर करून बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. आरोपी एटीएम आणि बाजारातील व्यवहारांमधून या नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात होते.
या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत. चौकशीदरम्यान या रॅकेटशी संबंधित आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून संशयास्पद नोटा आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




