महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यातील ४३ हजार ९६८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ


- आवश्यक प्रक्रिया मुदतीत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ४३ हजार ९६८ पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी २७ जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.

प्रशासनाला प्राप्त झालेल्या याद्यांनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३६ हजार ७५७, तर राष्ट्रीयीकृत बँकांचे ७ हजार २११ असे एकूण ४३ हजार ९६८ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

मात्र, कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या सर्व अटी व प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये आधार प्रमाणीकरण (e-KYC), ॲग्रीस्टॅक नोंदणी, तसेच आधार क्रमांक आणि बँक खाते परस्पर लिंक करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे, त्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तसेच आधार क्रमांक आणि बँक खाते अद्याप लिंक नसल्यास संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी, पात्र शेतकऱ्यांच्या प्रलंबित बाबी, विविध विभागांमधील समन्वय तसेच शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा निबंधक (सहकारी संस्था) जयसिंग राजपूत, अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष सोनोने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्जमुक्ती योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कर्जमुक्तीच्या याद्या प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या अपेक्षांना बळ मिळाले आहे. आता पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ त्यांना लवकरच मिळणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos