प्रबोधनाची नवी वाट दाखवणारे नाटक म्हणजे दोन घराचं गाव : जेष्ठ साहित्यिक डॉ प्रमोद मुनघाटे यांचे प्रतिपादन

- नवरगाव येथे दोन घराचं गाव या नाटकाचं थाटात प्रकाशन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : कलावंत आणि सामाजिक प्रबोधनाचा ध्यास घेतलेला कार्यकर्ता यांच्यातील द्वंद्व ज्या क्षणी संपते आणि त्या दोघांचा सर्जनशील संगम घडतो, त्या क्षणी सदानंद बोरकर यांच्यासारखा नाटककार जन्माला येतो. त्यांची नाट्यकृती ही केवळ कलाविष्कार नसून समाजमनाला अंतर्मुख करणारा, मूल्यांचा वेध घेणारा आणि परिवर्तनाची दिशा दाखवणारा चिंतनशील आविष्कार आहे.
संतपरंपरेपासून आपल्या संस्कृतीने जपलेली मानवी मूल्ये, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी आजच्या बदलत्या काळात कशा प्रकारे ढासळत चालल्या आहेत, याचे अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी चित्रण त्यांच्या साहित्यकृतीत आढळते. त्यामुळे त्यांचे लेखन हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाही. ते समाजाला आत्मपरीक्षणाची प्रेरणा देणारे, सांस्कृतिक मूल्यांचे पुनर्स्मरण करून देणारे आणि प्रबोधनाची नवी वाट दाखवणारे महत्त्वपूर्ण साहित्य ठरते.
असे प्रतिपादन महाराष्ट्राचे जेष्ठ साहित्यिक तथा साहित्य अकादमी, दिल्ली चे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. सदानंद बोरकर यांच्या दोन घराचं गाव या नाटकाच्या पुस्तक प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी तथा भाष्यकार म्हणून ते बोलत होते. सदर प्रकाशन सोहळा स्थानिक ज्ञानेश महाविद्यालय मराठी भाषा विभाग आणि स्तंभ पब्लिशिंग हाऊस, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पसायदान सभागृहात संपन्न झाला.
स्तंभ पब्लिशिंग हाऊस चंद्रपूरचे प्रकाशक अविनाश पोईनकर यांनी कार्यक्रमाची प्रस्थावना करून प्रकाशन संस्थेचा उद्धेश स्पस्ट केला. यावेळी नाट्य लेखक सदानंद बोरकर यांनी नाट्य निर्मितीची प्रेरणा आणि निर्मिती भाष्य केले.
दोन घराचं गाव हे नाटक लिहिताना माझा उद्धेश केवळ नाटक लिहिणे एवढाच न्हवता, तर आपल्या आसपास घडणाऱ्या वास्तवाला कलात्मक मूर्तरूप देणे हा होता. रंगभूमी हा समाजाचा आरसा आहे असे आपण म्हणतो. पण मला असे वाटते, रंगभूमी केवळ आरसा नाही तर ती समाजाला स्वतःचा चेहरा दाखविणारी सजग जाणीव आहे. असे ते म्हणाले.
आस्वादक म्हणून भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतराव बोरकर यांनी आपले विचार प्रकट केले. या प्रसंगी नाटकासाठी गाणी लिहुन ती सांगितबद्ध करणाऱ्या युवराज गोंगले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी भूषविले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमृत लंजे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. डॉ. गजानन कोर्तलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. अमृत लंजे यांनी केले. यावेळी नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गज प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
News - Chandrapur




Petrol Price




