महत्वाच्या बातम्या

 घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या भावाकडून लहान भावाची कुऱ्हाडीने हत्या : पत्नीही गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : घराच्या जागेच्या मालकीवरून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हत्येत झाल्याची धक्कादायक घटना सावली तालुक्यातील डोंगरगाव (म्हस्के) येथे घडली. सख्ख्या मोठ्या भावानेच लहान भाऊ व त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुकसू केशव बावणे ५० वर्ष यांचा शनिवारी पहाटे नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी योगिता कुकसू बावणे ४५ वर्ष यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे.

पाथरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या नावावरील घराच्या जागेवरून शामराव केशव बावणे ५३ वर्ष आणि त्यांचा धाकटा भाऊ कुकसू बावणे यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. शुक्रवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. संतापाच्या भरात शामराव बावणे यांनी कुऱ्हाडीने कुकसू यांच्या डोक्यावर सपासप वार केले. पतीला वाचविण्यासाठी धावलेल्या योगिता बावणे यांच्यावरही त्यांनी कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. जखमी कुकसू आणि योगिता बावणे यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे कुकसू बावणे यांची प्राणज्योत मालवली.

आरोपीला पोलिस कोठडी -

या प्रकरणातील आरोपी शामराव बावणे याला पाथरी पोलिसांनी शनिवारी सावली तालुका न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त केली असून आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ११७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरीचे ठाणेदार नितेश डोर्लीकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

आईच्या निर्णयाची सल ठरली जीवघेणी -

कुकसू बावणे हे तिघा भावांमध्ये सर्वात लहान होते. लोहारकामात कुशल असलेल्या कुकसू यांचा विळे तयार करण्याचा व्यवसाय होता. मोठा भाऊ आणि आईही त्यांच्या सोबत राहत होते. कुटुंबाचा सर्व खर्च कुकसूच सांभाळत असल्याने आईने घराची जागा त्यांच्या नावे केली होती. याच निर्णयाची सल शामराव यांच्या मनात कायम होती. त्यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत.

आईच्या निधनानंतरही शामराव बावणे हे अंत्यसंस्कार तसेच अंत्यदर्शनालाही गेले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादाचा अखेर हिंसक शेवट झाला आणि सख्ख्या भावानेच लहान भावाचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना घडली.

गावात हळहळ -

कुकसू बावणे यांच्या पश्चात पत्नी योगिता आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. शांत, कष्टाळू आणि सर्वांना मदत करणारा व्यक्ती म्हणून त्यांची गावात ओळख होती. त्यांच्या निधनाने डोंगरगाव (म्हस्के) परिसरात शोककळा पसरली असून, मालमत्तेच्या वादातून एका कुटुंबाची झालेली अपरिमित हानी पाहून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos