महावितरण कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा : स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करण्याची जोरदार मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढत्या वीजबिलांना आळा घालावा तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांवरील अन्याय थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस आणि NSUI यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी येथील महावितरण वितरण कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता देवगडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात तसेच वाढत्या वीजबिलांविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला. नागरिकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याचा निर्णय जनविरोधी असल्याचा आरोप करत हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी शासनावर टीका करत, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच आर्थिक अडचणीत सापडली असून त्यात स्मार्ट मीटरची सक्ती करून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. शासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठिंब्याने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला.
या मोर्चात माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सातपुते सर, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विलास चीचघरे, विजय लाड, प्रेमानंद कोवासे, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, अमर मोगरे, तेजस कोंडेकर, सुभाष कोठारे, आचल चलकलवार, ओमप्रकाश चौधरी, नेहा आभारे, संजय बुरांडे, पीपलदास सोयाम, जावेद खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता देवगडे यांना दिलेल्या निवेदनात स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढती वीजबिले कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच वीज ग्राहकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावर उपकार्यकारी अभियंता देवगडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून सर्व मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येतील तसेच त्या लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
News - Gadchiroli




Petrol Price




