अनिष्ट चाली रूढी परंपरांना नष्ट करण्याकरिता विज्ञान महत्वाचे : प्राचार्य संजीव गोसावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारत देश हा महासत्ता बनण्याच्या वाटेने असतांना सुद्धा आधुनिक युगामध्ये अजूनही समाजामध्ये काही ठिकाणी अनिष्ट चाली परंपरा चालू आहेत. त्या पूर्ण पणे नष्ट करणे हे केवळ विज्ञानालाच शक्य आहे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजीव गोसावी यानि व्यक्त केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलताना ते पुढे म्हणाले कि, आपल्या देशात विज्ञानाची जुनी परंपरा आहे. पण समाजाचा दृष्टिकोन अवैज्ञानिक असेल तर मग त्या समाजात गॅलिलिओला क्षमायाचना करावी लागते, र. धों. कर्व्यांना बहिष्कारास तोंड द्यावे लागते आणि विज्ञाननिष्ठा रुजविणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांना गोळीची शिकार व्हावे लागते. म्हणून फक्त वैज्ञानिक दृष्टी बाळगली कि या साऱ्याच्या पलीकडे बघता येते, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विज्ञानाच्या अंगाने विचार करणे, विश्लेषण करणे आणि स्वत:चे निष्कर्ष काढणे त्याचबरोबर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये वैज्ञानिक प्रक्रिया अंतर्भूत करणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टी होय हि प्रत्येकाच्या अंगी असणे तेवढेच गरजेचे आहे.
गरज हि शोधाची जननी आहे. या उक्ती प्रमाणे जिथे प्रश्न निर्माण झाला तिथे उत्तर नक्की असेल म्हणून एखादी गोष्ट निव्वळ पाहणे गरजेचे नसून ते निरीक्षण करणे महतवाचे आहे. असे समान सूर प्रमुख अतिथींच्या भाषणातून दिसून आले, जे मिळालेले आहे ते असेच असते असे ग्राह्य धरण्यापेक्षा एखाद्या गोष्टींमध्ये का व कसे याची उत्तरे जो शोधण्याचा प्रयत्न करतो तो नक्कीच खरा विज्ञानवादी असतो. असे मत उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये आंतरहाऊस प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, व वीर सावरकर या चारही हाऊस नि सहभाग नोंदविला होता, कार्यक्रमाच्या सुरुवातील डॉ. सी वि रामन व मदर तेरेसा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य संजीव गोसावी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, व समस्त विज्ञान शिक्षक होते, प्रसंगी अजय वानखेडे, प्रा. डॉ. राकेश चडगुलवार, रुपेश बारसागडे, देवेंद्र म्हशाखेत्री, यांनीही मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात प्रेमसुधा मडावी यांच्या मार्गदर्शनात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १३० गुण मिळवीत वीर सावरकर हाऊस मधील योग नैताम, कृतार्थ गोमासे, नमन तुलावी, कौशिक जिद्देवार, मोक्ष वेलादी यांनी प्रथम क्रमांक तर ८५ गुणांसह चंद्रशेखर आझाद हाऊस मधील श्लोक पोटवार, काव्य जुमनाके रतन उडपी, प्रज्वल उपरे यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे, मान्यवरांच्या हस्ते चारही सहभागी संघाला विशेष पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र उंदीरवाडे, प्रेमसुधा मडावी यांनी केले तर आभार रमण गांगापूरवार यांनी मानले. कार्यक्रमाला क्विझ मास्टर म्हणून प्रेमसुधा मडावी, शहदूला खान, रमण गागापूरवार, नरेंद्र उंदीरवाडे यांनी तर टायमर व स्कोरर म्ह्णून अजय वानखेडे व संतोष कुळमेथे यांनी व सचिन धकाते व सिद्धू धंदरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
News - Gadchiroli