महत्वाच्या बातम्या

 ग्राहक बनून आला अन् वृद्धेच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची चैन हिसकावून झाला फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील भरवस्तीत असलेल्या किराणा दुकानात बसलेल्या ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरट्यांनी थरारक पद्धतीने पलायन केल्याची घटना शनिवारी ९ मे रोजी रात्री घडली. 

प्राप्त माहितीनुसार, कमल सुधाकर हेडाऊ (वय ७३), रा. गजानन महाराज मंदिर रोड, स्नेहनगर या आपल्या मुलाच्या विठ्ठल किराणा स्टोअर्स दुकानात बसल्या होत्या. रात्री सुमारे ९.१५ वाजताच्या दरम्यान एक अनोळखी इसम ग्राहकाच्या स्वरूपात दुकानात आला. त्याने प्रथम कुरकुरेचे पाकीट घेतले व त्यानंतर चिप्सचे पाकीट मागितले. वृद्ध महिला चिप्स काढण्यासाठी मागे वळताच आरोपीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाची, सुमारे १ लाख २० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून तोडली.

घटनेनंतर महिलेने आरडाओरड केली असता त्यांचा मुलगा संजय हेडाऊ हा घरातून बाहेर धावत आला व आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यावर आधीपासून वाहनासह थांबलेल्या साथीदाराच्या मदतीने आरोपी क्षणार्धात पसार झाला.

या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ वस्तू खरेदीच्या बहाण्याने वृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा धाडसी वावर पुन्हा समोर आला आहे. विशेष म्हणजे, घटना गजबजलेल्या परिसरात घडल्याने नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

रामनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos