महत्वाच्या बातम्या

 गोवंश कत्तलीसाठी पायदळ वाहतूक उघड : कोरपना पोलिसांच्या कारवाईत पाच जनावरे मुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना पोलिसांनी गो-तस्करीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेल्या जात असलेल्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका केली असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गो-तस्करांच्या नव्या पद्धतीचा पर्दाफाश झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास कोरपना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एक इसम सावलहिरा ते येलापूर मार्गे मेंढीगुडा (तेलंगणा) येथे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे     पोलिसांनी सावलहिरा-येलापूर घाट परिसरात नाकाबंदी केली.

नाकाबंदी दरम्यान एक व्यक्ती पाच गोवंशीय बैलांना एकमेकांना दोरीने बांधून निर्दयतेने पायदळ नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे जनावरांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कागदपत्रे व पावत्या मागितल्या असता त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तऐवज नसल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तीन पांढऱ्या रंगाचे बैल प्रत्येकी १५ हजार रुपये किंमतीचे तसेच दोन धामन्या रंगाचे बैल प्रत्येकी १५ हजार रुपये किंमतीचे असे एकूण ७५ हजार रुपयांचे पाच गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.

या प्रकरणी लक्ष्मण लेतू कोडापे (वय ४०), रा. गुडशेला, ता. जिवती, जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध कोरपना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६५/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमातील कलम ५(अ), ५(ब), ६, ९ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरपना पोलीस ठाण्याची हद्द तेलंगणा राज्याला लागून असल्याने या भागात गो-तस्करीच्या घटना वारंवार घडत असतात. तस्करांकडून विविध शक्कली लढवून गोवंशाची वाहतूक केली जात असली तरी यावेळी चक्क जनावरे पायदळ कत्तलीसाठी नेत असताना पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार काश्यप वाळके व विशाल मोरे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास नापोअं रामदास आडे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos