महत्वाच्या बातम्या

 सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणात १५ दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही


- जिमलगट्टा कारवाईत १०.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त : अन्न प्रशासनाच्या फिर्यादीची प्रतीक्षा असल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला असला, तरी या कारवाईला १५ दिवस उलटल्यानंतरही संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पोलिस आणि अन्न प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून, एवढ्या मोठ्या प्रकरणात कारवाईला विलंब का होत आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे ९ जुलै रोजी उपअधीक्षक राहुल मडावी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या तस्करीचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत २ लाख ७२ हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू तसेच वाहन असा एकूण १० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या कारवाईची माहिती पोलिसांनी माध्यमांना प्रेस नोटद्वारे दिली होती. त्यानंतर कारवाईच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, कारवाईनंतर १५ दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपीविरोधात अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.

अन्न प्रशासनाच्या फिर्यादीची प्रतीक्षा -

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या प्रकरणात अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची फिर्याद आवश्यक आहे. यासंदर्भात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना लेखी पत्र देण्यात आले आहे. मात्र, संबंधित अधिकारी अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रखडली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.ध्या जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीला नोटीस बजावून सोडण्यात आले आहे, अशी माहिती उपअधीक्षक राहुल मडावी यांनी दिली.

तस्करीचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा -

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी गडचिरोली शहरातील असून तो अनेक वर्षांपासून तंबाखू तस्करीच्या साखळीत सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडल्याने त्याचे मनोबल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिबंधित तंबाखूच्या विक्री आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाईची गरज असताना गुन्हा दाखल होण्यास होणाऱ्या विलंबामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त झाल्यानंतरही पुढील कायदेशीर प्रक्रिया संथ का आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही -

या प्रकरणासंदर्भात अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.दरम्यान, पोलिस आणि अन्न प्रशासन विभागातील समन्वयाअभावी कारवाई रखडली आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित प्रकरणात तातडीने पुढील कारवाई करून आरोपीविरोधात कठोर पावले उचलली जातील का, याकडे आता लक्ष लागले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos