घरातून ४६ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठा जप्त : ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात धडक कारवाई करत एका घरातून ४६ हजार ३९५ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ब्रह्मपुरीपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावरील रुई येथील रहिवासी भानुदास मारोती चौधरी याने आपल्या घरात विक्रीच्या उद्देशाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूचा अवैध साठा करून ठेवला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी ११ जुलै रोजी उशिरा सायंकाळी संबंधित घरावर छापा टाकला.
छाप्यावेळी आरोपी घरात आढळून आला नाही. मात्र, घराची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा हुक्का शीशा तंबाखू तसेच इतर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत ४६,३९५ रुपये असल्याचे सांगितले.
जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे करीत आहे.
सदर कारवाई ब्रम्हपुरी चे ठाणेदार प्रमोद बनबाले यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोअं निलेश तुमसरे, प्रविण भिवगडे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार , वशिष्ठ रंगारी, मपोअं चित्ररेखा यांनी केले
News - Chandrapur




Petrol Price




