महत्वाच्या बातम्या

 यूडीआयएसई कोडचा गैरवापर करून २२७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर २९.६० लाखांचा डल्ला


- बनावट विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक; सहसंचालकांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांत गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : यूडीआयएसई (युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन) कोडचा गैरवापर करून २२७ विद्यार्थ्यांच्या नावावर शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेतील तब्बल २९ लाख ६० हजार १०० रुपयांचा निधी अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूर येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक संतोष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उच्च शिक्षण विभागाने २०२१-२०२२ आणि २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांतील नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर नोंदणीकृत संस्थांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासकीय अधिकारी शंकर बर्गे आणि वरिष्ठ लिपिक जितेंद्र परतेकी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी तसेच भंडारा जिल्ह्यातील स्व. तुळसीरामजी तितरमारे खासगी आयटीआय, मोहाडी या संस्थांची तपासणी केली.

तपासणीदरम्यान मोहाडी येथील संस्थेच्या नावावर २२७ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर संस्थेचे लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि यूडीआयएसई कोडचा वापर करून सादर करण्यात आल्याचे आढळले. मात्र, पुढील चौकशीत संबंधित विद्यार्थी प्रत्यक्षात त्या संस्थेत शिक्षण घेत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी बनावट माहितीचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले.

पोलिस तपासानुसार, शांतुकराव हंबर्डे आणि झरीना खातून यांनी स्व. तुळसीरामजी तितरमारे खासगी आयटीआयच्या यूडीआयएसई कोडचा गैरवापर केला. आरोपींनी स्वतःला अनुक्रमे संस्थेचे प्रमुख आणि संस्था नोडल अधिकारी असल्याचे भासवून २२७ विद्यार्थ्यांचे बनावट शिष्यवृत्ती अर्ज पोर्टलवर सादर केले. या अर्जांच्या आधारे शासनाकडून २९ लाख ६० हजार १०० रुपयांचा शिष्यवृत्ती निधी बेकायदेशीररीत्या मिळविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, संबंधित संस्थेचे अधिकृत प्रमुख कृणाल भोंग तर नोडल अधिकारी भूषण तितरमारे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांच्या नावाऐवजी बनावट माहितीचा वापर करून संपूर्ण गैरव्यवहार करण्यात आला.

या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत नागपूर येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक संतोष चव्हाण ५२ वर्ष यांनी स्वतः फिर्यादी म्हणून तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या घोटाळ्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. शिष्यवृत्ती योजनेतील लाखो रुपयांच्या अपहारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी अधिक काटेकोर करण्याची गरज व्यक्त होत आहे





  Print






News - Bhandara




Related Photos