विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील पांजरा येथील २३ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांजरा येथील रहिवासी आशिष प्रभूदयाल मस्करे (वय २३) याने २८ जून रोजी विषारी औषध प्राशन केले. त्याची प्रकृती बिघडल्याने सकाळी सुमारे १० वाजता त्याला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
अखेर त्याच दिवशी रात्री सुमारे १०.३० वाजता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तरुणाने विषारी औषध प्राशन करण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार बेर्वे करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




