महत्वाच्या बातम्या

 घाटंजी दिवाणी व फौजदारी न्यायालयात धनादेश अनादर : कलम १३८ विषयावर कायदेविषयक शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी (जि. यवतमाळ) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, घाटंजी येथे बुधवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता घाटन्जी तालुका विधी सेवा समिती आणि घाटंजी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ चे कलम १३८ - धनादेश अनादर व कायदेशीर तरतुदी या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन घाटंजी वकील संघाचे सचिव ॲड. वैभव महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाटन्जी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदन्डाधिकारी प्रवीण पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक सरकारी अधिवक्ता ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, घाटन्जी तालुका वकील संघाच्या अध्यक्षा ॲड. नीता मनोज राठोड, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गणेश धात्रक आणि सहसचिव ॲड. योगिता महेश पवार हे मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांचे मार्गदर्शन -
- ॲड. गणेश धात्रक यांनी कलम १३८ अंतर्गत धनादेश अनादराच्या प्रकरणातील कायदेशीर बारकावे, वैधानिक नोटीसची प्रक्रिया, न्यायालयीन कार्यवाही आणि बचावाचे मुद्दे याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

- ॲड. नीता राठोड, अँड निलेश शुक्ला व ॲड. सादिक खान यांनीही या विषयाशी संबंधित महत्त्वाच्या तरतुदींवर प्रकाश टाकून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

- दिवाणी व फौजदारी न्यायाधीश प्रवीण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, लोकअदालतीचे महत्त्व विषद केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार १८ जुलै २०२६ व २१ नोव्हेंबर २०२६ रोजी धनादेश अनादर प्रकरणांसाठी विशेष लोक न्यायालय आयोजित करण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकअदालतीमध्ये सामोपचाराने व परस्पर संमतीने कसा जलद न्याय मिळवता येतो आणि प्रकरणांचा कायमचा निपटारा कसा होतो, याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली.

पक्षकारांना आवाहन -
दिवाणी व फौजदारी न्यायाधीश प्रविण पाटील यांनी स्पष्ट केले की, ज्या पक्षकारांची न्यायालयात पराक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १३८ अंतर्गत धनादेश अनादराची प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा दाखलपूर्व (Pre-litigation) वाद आहेत, त्यांनी ती सामंजस्याने व तडजोडीने मिटवण्यासाठी संबंधित न्यायालयात किंवा घाटन्जी तालुका विधी सेवा समिती, घाटंजी येथे त्वरित अर्ज करावा. 

अधिक माहिती व सहाय्यासाठी यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या हेल्पलाईन क्र. ८५९१९०३६२९ वर संपर्क साधावा.

अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कायदेविषयक शिबिराच्या यशस्वीतेसाठी घाटन्जी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी आणि घाटंजी वकील संघाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी, अधिवक्ता अँड. अनंतकुमार पांडे, अँड. मनोज राठोड, अँड. विनय चव्हाण, अँड. निलेश चवरडोल, अँड. चंद्रकांत मरगडे, अँड. शुभम धुमाळ, अँड. गुंडावर मॅडम इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos