महत्वाच्या बातम्या

 महिला वनरक्षकांना पॉश कायद्याचे धडे : ताडोबात दोन दिवसीय कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कार्यस्थळी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (POSH) कायद्याबाबत जनजागृती करून महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि निर्भय कार्यपरिसर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर), चंद्रपूर आणि रिझ्युम संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मदनापूर येथील सभागृहात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला वन कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यशाळेत पळसगाव, शिवणी, कारवा आणि खडसंगी वनपरिक्षेत्रातील महिला वनरक्षक तसेच चिमूर विशेष व्याघ्र संरक्षण दल (एसटीपीएफ) मधील महिला वनरक्षकांनी सहभाग घेतला. कार्यस्थळी महिलांचे हक्क, लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदी, तक्रार निवारण प्रक्रिया आणि सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षक कोमल वैद्य, ॲड. पल्लवी माटे आणि डॉ. प्राजक्ता धोटे यांनी पॉश कायद्याची उद्दिष्टे, त्यातील महत्त्वाची कलमे आणि महिला कर्मचाऱ्यांनी कायदेशीर संरक्षणाचा प्रभावीपणे कसा उपयोग करावा, याविषयी सखोल माहिती दिली. तसेच कार्यस्थळी उद्भवणाऱ्या विविध परिस्थितींना कायदेशीर चौकटीत राहून कसे सामोरे जावे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उपजीविका अधिकारी प्रशांत वाहाणे आणि पळसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी बारसागडे यांनी समन्वयाची जबाबदारी सांभाळली. या उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये पॉश कायद्याविषयी जागरूकता वाढून सुरक्षित आणि संवेदनशील कार्यपरिसर निर्माण करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.





  Print






News - Chandrapur




Related Photos