महत्वाच्या बातम्या

 पावसाळी अधिवेशनात अहेरीच्या १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचा प्रश्न : आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची ठाम भूमिका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित केला. अत्याधुनिक सुविधा असलेली भव्य रुग्णालयाची इमारत उभी असतानाही आवश्यक पदांना मान्यता नसल्यामुळे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडल्याने रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याचा मुद्दा त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिला.

डॉ. आत्राम यांनी सभागृहात सांगितले की, अहेरी येथे सुमारे दीड वर्षांपूर्वी १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज इमारत उपलब्ध असूनही आवश्यक मनुष्यबळाच्या अभावामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा मर्यादित स्वरूपात सुरू आहे. डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे नागरिकांना अपेक्षित दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत नसून, विशेषतः महिला आणि बालकांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

या परिस्थितीमुळे शासनाने तातडीने आवश्यक पदांना मंजुरी देऊन भरती प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून रुग्णालयाची संपूर्ण क्षमता नागरिकांच्या सेवेसाठी वापरता येईल, अशी मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य शासनाने आरोग्य विभागातील ५,००० पदांना मान्यता दिल्याची माहिती सभागृहात दिली. पदमान्यतेचा प्रश्न आता निकाली निघाला असून, येत्या महिनाभरात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अहेरीसह राज्यातील आवश्यक रुग्णालयांतील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर अहेरीच्या १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयात लवकरच डॉक्टर, परिचारिका आणि इतर आवश्यक कर्मचारी उपलब्ध होऊन रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे अहेरीसह परिसरातील हजारो महिला, बालके आणि सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos