महत्वाच्या बातम्या

 आदिलाबादमधून चोरीची दुचाकी कोरपन्यात पकडली : सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिलाबाद येथून चोरी झालेली मोटारसायकल कोरपना पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडली. या मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या सराईत गुन्हेगारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाईसाठी त्याला आदिलाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशानुसार कोरपना पोलिसांकडून ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहन तपासणी व नाकाबंदी मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी वणसडी टोलनाक्याजवळ एक इसम संशयास्पदरीत्या दुचाकीवरून येताना पोलिसांना आढळला. नाकाबंदी दिसताच त्याने वाहन वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला थांबविले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव मिलिंद जयभारत डंवरे ३३ वर्षे रा. लोणी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर असे सांगितले. त्याच्याकडील TS-01-ER-0473 क्रमांकाच्या मोटारसायकलबाबत पोलिसांनी आदिलाबाद पोलिसांशी संपर्क साधला. तपासात सदर मोटारसायकल आदिलाबाद बसस्थानक परिसरातून चोरीस गेल्याचे आणि याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

दरम्यान, संशयिताची माहिती ICJS प्रणालीवर तपासली असता त्याच्याविरुद्ध पांढरकवडा जि. यवतमाळ येथे दोन, राजुरा जि. चंद्रपूर येथे दोन आणि मडचांदूर जि. चंद्रपूर येथे एक, असे एकूण पाच गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम ३५(ब) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. चोरीची मोटारसायकल आदिलाबाद येथील संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार नामदेव पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण नुनूंचे यांनी केली.

कोरपना पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे पोलिसांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos