महत्वाच्या बातम्या

 नंदोरी टी-पॉइंटवर विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश : स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मध्यप्रदेशातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई करत पाच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन वरोरा हद्दीतील मौजा नंदोरी टी-पॉइंट परिसरात सापळा रचला. यावेळी अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आला.

कारवाईदरम्यान १ लाख ८३ हजार ८५८ रुपयांच्या २९ पेट्यांमध्ये भरलेल्या एकूण ३५३ विदेशी दारूच्या शिश्या, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ३ लाख रुपये किमतीची टोयोटा इटिओस जीडी क्रमांक एमएच ०१ बीटी १०८७ कार तसेच ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख १५ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी नरेंद्र जितेंद्र भाट (वय ३१ वर्षे), रा. जलनगर, चंद्रपूर व दामिनी नरेंद्र भाट रा. जलनगर, चंद्रपूर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सूर्या ऊर्फ सूरज परसंगे रा. जलनगर, चंद्रपूर हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (ई)(अ) व ८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, संतोष येलपुलवार , जयसिंह, गणेश भोयर, सचिन गुरनुले, गजानन मडावी यांनी केले.

मध्यप्रदेशातून चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या अवैध मद्य तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा कडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून या कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos