महत्वाच्या बातम्या

 मद्यधुंद मुलाच्या अमानुष मारहाणीत जखमी आईचा उपचारादरम्यान मृत्यू : आरोपी मुलाला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तालुक्यातील कोरंबी येथे मद्यधुंद अवस्थेत मुलाने केलेल्या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आईचा उपचारादरम्यान बुधवारी  मृत्यू झाला. प्रतिभा मारोती मोहूरले ५५ वर्षे असे मृत महिलेचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोंडपिपरी पोलिसांनी आरोपी मुलगा सूरज मारोती मोहूरले याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरंबी येथील सूरज मारोती मोहूरले हा दारूच्या नशेत घरी आला होता. क्षुल्लक कारणावरून त्याचा वडिलांशी वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि सूरजने आपल्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातील हा प्रकार पाहून आई प्रतिभा मोहूरले या पतीचा बचाव करण्यासाठी आणि मुलगा-वडिलांमधील वाद मिटविण्याच्या उद्देशाने मध्ये पडल्या.

मात्र, मद्याच्या नशेत विवेक गमावलेल्या सूरजने जन्मदात्या आईचाही विचार न करता त्यांच्यावर अत्यंत निर्दयीपणे हल्ला केला. या मारहाणीत प्रतिभा मोहूरले गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापती झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने गोंडपिपरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी प्रथम चंद्रपूर आणि त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले.

ज्या मुलाला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, त्याच मुलाच्या हातून आईचा दुर्दैवी अंत झाल्याने कोरंबीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सूरज मोहूरले याला अटक केली. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos