कौशल्य दिनानिमित्त दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

- ३६ उमेदवारांची प्राथमिक निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ .०० ते दुपारी. ३ .०० या वेळेत बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये खाजगी क्षेत्रातील विविध ११ नामांकित कंपन्यांनी ३२६ रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सदर मेळाव्यात एकूण ४२२ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यामध्ये पुरूष २४९ व महिला १७३ आहेत.
१५७ उमेदवारांनी प्रत्यक्ष आणि १६५ उमेदवारांनी गुगलफॉर्मद्वारे नोंदणी केली . सदर रोजगार मेळाव्यात २५७ उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित होते. त्यापैकी ३७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकानंद नवखरे प्राचार्य नवजीवन महाविद्यालय साकोली हे उपस्थित होते.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सुनंदा बजाज सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, मा. सौ. देवश्री कापगते नगराध्यक्षा नगर परिषद साकोली, डॉ. अतिश शहारे प्राचार्य बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली आणि विजय पांडव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
देवश्री कापगते नगराध्यक्षा नगर परिषद साकोली यांनी तरुणांना रोजगाराची नितांत गरज असल्याचे सांगत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मुलाखती द्याव्यात व कोणत्याही छोट्या-मोठ्या कामातून आपल्या करिअरची सुरुवात करावी, असे आवाहन केले.
यासोबतच डॉ. अतिश शहारे प्राचार्य बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधींविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकानंद नवखरे प्राचार्य नवजीवन महाविद्यालय यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
अविनाश खेडीकर DSDA यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळावा, PMGKVK, PMKUVA, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सेवायोजन कार्ड नोंदणी, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, इज्राईल देशात रोजगाराच्या सुवर्ण संधी, स्किल इंडिया स्पर्धा इ. योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली.
सदर रोजगार मेळावा यशस्वीरीत्या पार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा कार्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद , तसेच बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसीचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
News - Bhandara




Petrol Price




