" /> "/>
महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात मध्यरात्री आरपीसी पथकासह शंभरावर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन


- गुन्हेगार टवाळखोर आणि संशयितांमध्ये खळबळ : चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन तास धडक कारवाई

विदर्भ न्युज  एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर पोलिसांनी रविवारी (१३ जुलै) मध्यरात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. दंगा नियंत्रण (आरपीसी) पथकासह शंभरावर पोलिस अधिकारी व कर्मचारी एकाच वेळी शहरातील विविध भागांत उतरल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती, टवाळखोर आणि मद्यपींमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकांनी पोलिसांचा ताफा पाहताच घटनास्थळावरून पळ काढल्याचे चित्र दिसून आले.

रात्री १०.३० ते मध्यरात्री १२.३० या दोन तासांच्या कालावधीत चंद्रपूर शहर, दुर्गापूर, पडोली आणि रामनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जनस्थळे, संवेदनशील परिसर, सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख चौक तसेच गुन्हे घडण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये ही धडक मोहीम राबविण्यात आली. अचानक मोठ्या संख्येने पोलिस रस्त्यावर उतरल्याने रात्री विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले.

पोलिस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या आदेशानुसार ही मोहीम पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहर, दुर्गापूर, पडोली आणि रामनगर या चारही पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, पोलिस अंमलदार तसेच आरपीसी (दंगा नियंत्रण) पथकाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची ही नियोजनबद्ध कारवाई असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई -

विशेष मोहिमेदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. अशा वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेऊन संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा केले. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण रेंगाळणाऱ्या तसेच शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

प्रमुख चौकांत कडक नाकाबंदी -

शहरातील प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या मार्गांवर रात्री कडक नाकाबंदी करण्यात आली होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे, भरधाव वेगाने वाहन चालविणारे तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पोलिसांना यश आले.

संवेदनशील परिसरांची कसून तपासणी -

मोहीमेदरम्यान रेल्वे स्थानक परिसर, बसस्थानक, सार्वजनिक स्थळे, निर्जन भाग, मुख्य चौक तसेच गुन्हे घडण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांची सखोल तपासणी करण्यात आली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींची जागेवरच चौकशी करून त्यांची ओळख आणि पडताळणी करण्यात आली.

अशा मोहिमा नियमितपणे राबविणार -

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी सांगितले की, "शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे हा या विशेष कोम्बिंग ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे. रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणारे टवाळखोर, संशयित व्यक्ती आणि संशयास्पद वाहनांवर पोलिसांची करडी नजर कायम राहील. अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे आणि अचानक राबविण्यात येतील. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तातडीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे."





  Print






News - Chandrapur




Related Photos