बल्लारपूर तालुक्यात पीक विमा नोंदणीला वेग : ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा नोंदणी प्रक्रिया सुरू असून बल्लारपूर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात येत आहे. पीक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक (AgriStack) ओळखक्रमांक असणे आवश्यक असून डिजिटल पीक सर्वेक्षणानुसार पिकांची अचूक नोंद करणे बंधनकारक आहे.
कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, प्रत्यक्ष शेतात पेरणी केलेले पीक आणि डिजिटल पीक सर्वेक्षणातील नोंद यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित पीक विमा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी.
बिगर कर्जदार शेतकरी बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करू शकतात. तर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर पडायचे असल्यास त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी संबंधित बँकेला लेखी सूचना देणे आवश्यक आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी मुदतीत पीक विमा नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




