सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी नियुक्ती देऊ नये


- उच्चशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याऐवजी निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे अन्यायकारक – सुनिल नंदनवार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्हा परिषदेने ५ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या पत्रानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यासाठी १० ऑगस्ट रोजी समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यात मोठ्या संख्येने उच्चशिक्षित आणि पात्र बेरोजगार युवक शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असताना सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे हा बेरोजगार युवकांवर अन्याय असल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरमोरी विधानसभा क्षेत्र सहअध्यक्ष सुनिल नंदनवार यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षण क्षेत्रात सेवा देऊन नियमानुसार सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा त्याच पदावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याऐवजी डी.एड, बी.एड, टीईटी, सीटीईटी तसेच इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले हजारो युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. शासनाने नवीन पिढीतील पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, असे नंदनवार यांनी म्हटले.
गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात स्थानिक उच्चशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक युवकांनी शिक्षक होण्यासाठी आवश्यक शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण केले असून ते वर्षानुवर्षे सरकारी शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी नियुक्ती दिल्यास नवीन पात्र उमेदवारांच्या रोजगाराच्या संधी मर्यादित होणार नाहीत का? असा सवालही नंदनवार यांनी उपस्थित केला.
शिक्षकांची कमतरता असल्यास शासनाने कायमस्वरूपी शिक्षक भरतीची प्रक्रिया गतिमान करावी. तोपर्यंत उपलब्ध पात्र बेरोजगार उमेदवारांना पारदर्शक पद्धतीने कंत्राटी अथवा तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्याचा पर्याय विचारात घ्यावा. सेवानिवृत्त शिक्षकांचा अनुभव निश्चितच महत्त्वाचा आहे. मात्र रोजगाराच्या वयात असलेल्या पात्र युवकांना संधी नाकारून निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेने ५ ऑगस्ट २०२६ च्या पत्राचा पुनर्विचार करून सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी नियुक्तीची प्रक्रिया थांबवावी आणि जिल्ह्यातील पात्र, उच्चशिक्षित व बेरोजगार युवकांना प्राधान्य देऊन शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सुनिल नंदनवार यांनी केली आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे ही शासनाची जबाबदारी आहे. निवृत्तीनंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्ती देणे हा बेरोजगारांच्या संधीवर घाला आहे. त्यामुळे या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी नंदनवार यांनी केली.
News - Gadchiroli




Petrol Price




