विश्वासाचा गैरफायदा घेत महिलेची २५.९० लाखांची फसवणूक : चंद्रपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विश्वास संपादन करून उपचार, घराची दुरुस्ती तसेच कुटुंबाच्या कल्याणाचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी वैशाली अनिल खनके ४० वर्षे रा. जोड देऊळ, पठाणपुरा वॉर्ड, चंद्रपूर या शेती व्यवसाय करतात. इरई नदी पुलासाठी त्यांची शेती संपादित झाल्याने मिळालेली नुकसानभरपाईची रक्कम त्यांनी बँक ऑफ इंडिया येथील संयुक्त खात्यात ठेवली होती.
दरम्यान, त्यांच्या परिसरात राहण्यासाठी आलेल्या आरोपी विद्या निमजे हिच्याशी फिर्यादीची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या पतीला बरे करणे, घराची दुरुस्ती करून देणे तसेच विविध कारणे सांगून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम उचलून घेतली. आरोपीने फिर्यादीकडून बँकेतील धनादेश भरून ५ लाख २५ हजार रुपये घेतले.
यानंतर आरोपीने फिर्यादीचा अधिक विश्वास संपादन करत आरोग्य सुधारण्याच्या नावाखाली विविध गोष्टी सांगितल्या. तसेच कुटुंबाचे कल्याण होईल, असा विश्वास निर्माण करून फिर्यादीकडून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले.
तसेच २४ जुलै २०२६ रोजी आरोपीने फिर्यादीला बँक ऑफ इंडिया शाखेत नेऊन मुदत ठेव एफडी मोडून १० लाख रुपये काढण्यास सांगितले. ही संपूर्ण रक्कम आरोपीने स्वतःकडे घेतली. त्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी घर खरेदीसाठी घरात ठेवलेले आणखी १० लाख रुपये देखील आरोपीने घेतले.
यानंतर फिर्यादीच्या कुटुंबीयांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली असता, पैसे खर्च झाल्याचे सांगून परत देण्यास नकार दिला. अशा प्रकारे आरोपीने विश्वासघात करून रोख २५ लाख २५ हजार रुपये व सुमारे ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज फसवणुकीने घेतले.
या प्रकरणी फिर्यादी वैशाली खनके हिच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी विद्या निमजे हिच्याविरुद्ध २६ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खंडाईत करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




