महत्वाच्या बातम्या

  विषारी औषध प्राशन केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू


- मोहनटोला येथील घटना; देवरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : विषारी औषध प्राशन केल्याने ५४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोहनटोला येथे शनिवारी ८ आगस्ट दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. रमेश भुरेसिंग बैस ५४ वर्षे रा. मोहनटोला, ता. देवरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बैस यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रमेश बैस यांची तपासणी केली. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवरी पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली. मृताचा मुलगा निशांत रमेश बैस २३ वर्षे रा. मोहनटोला याने दिलेल्या तक्रारीवरून देवरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रमेश बैस यांनी विषारी औषध प्राशन करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास हवालदार गोपीचंद इस्कापे करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos