रक्ताच्या वाढीव दरामुळे रुग्णांचा बीपी हाय : शासकीय रक्तपिशवी २५० तर खासगीवर १०० रुपयांनी वाढ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : कोरोनानंतर अनेक हॉस्पिटलने आपले दर वाढविल्याने सामान्यांचा रक्तदाब वाढला असताना आता त्यात रक्त पिशव्यांच्या किमतीतही वाढ करण्यात आली. शासकीय रक्तपेढीतील रक्तपिशवीवर २५० तर खासगी रक्तपेढीतील रक्तपिशवीवर १०० रुपयांनी वाढ झाली. रक्तपिशव्यांच्या या नव्या दरामुळे रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
वैद्यकीय उपचारांदरम्यान अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकांची उपलब्धता फार महत्त्वाची असते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्तपिशव्यांच्या किमतीत वाढ केल्यानंतर, खासगी रक्तपेढीत मिळणारी रक्ताची पिशवी यापूर्वी १ हजार ४५० रुपयांना मिळत होती, त्यात १०० रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्याची किंमत १,हजार ५५० रुपये झाली आहे. याशिवाय सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची पिशवी ८५० रुपयांना मिळायची. आता त्यात २५० रुपयांची वाढ झाल्याने १ हजार १०० रुपयांची झाली आहे. विशेष म्हणजे, शासकीय व खासगी रक्तपेढीतील प्लाझ्मा, प्लेटलेट्स व क्रायोप्रेसिपिटेटच्या दरात वाढ झालेली नाही.
शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत रक्त
शासकीय रुग्णालय असलेल्या मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त देण्याची सोय आहे. परंतु, रोज रक्तदात्यांकडून उपलब्ध होणारे रक्त व मागणी यात मोठी तफावत असते. त्यामुळे अनेकदा रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्तदान केल्यावरच त्यांना मोफत रक्त देण्याची अट टाकली जाते. या रक्तपेढीतून बाहेर रक्त नेणाऱ्यांना आता होल ब्लड व लाल रक्त पेशीवर प्रत्येकी २५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
आठ वर्षांनंतर वाढ, तीही तुटपुंजी
कोरोनानंतर अनेक गोष्टींच्या किमती वाढल्या. रक्तपेढीतील रिएजेंटसह कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली. त्या तुलनेत आठ वर्षांनंतर रक्त पिशवीची वाढलेली किंमत फारच तुटपुंजी आहे. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे, असे काही खासगी रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे.
शासकीय रक्तपेढीतील सुधारित शुल्क -
संपूर्ण रक्त : १ हजार १०० रुपये प्रती बॅग
लाल रक्त पेशी : १ हजार १०० रुपये प्रती बॅग
प्लाझ्मा : ३०० प्रती बॅग (बदल नाही)
प्लेटलेट्स : ३०० प्रती बॅग (बदल नाही)
क्रायोप्रेसिपिटेट : २०० रुपये (बदल नाही)
खासगी रक्तपेढीतील सुधारित शुल्क -
संपूर्ण रक्त : १ हजार ५५० रुपये प्रती बॅग
लाल रक्त पेशी : १ हजार ५५० रुपये प्रती बॅग
प्लाझ्मा : ४०० प्रती बॅग (बदल नाही)
प्लेटलेट्स : ४०० प्रती बॅग (बदल नाही)
क्रायोप्रेसिपिटेट : २५० रुपये (बदल नाही)
News - Nagpur