महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील १३ शिक्षकांना गुणगौरव पुरस्कार


- शिक्षक दिनी होणार पुरस्कार वितरण; जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, पोलिस अधीक्षकांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शाळांच्या विकासात योगदान देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील १३ शिक्षकांना यंदाचा जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ३ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जातो. शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे तसेच इतर शिक्षकांना गुणवत्तापूर्ण आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. यंदा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून प्राथमिक गटातील १२ आणि माध्यमिक गटातील एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सामाजिक न्याय भवनात पुरस्कार वितरण -
पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवनातील समाज कल्याण विभागाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि पोलिस अधीक्षक एम. रमेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाते. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळ्याची शिक्षण विभागाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

प्राथमिक गटातील १२ शिक्षक मानकरी -
प्राथमिक गटातून समय्या सद्दी नडीकुडा, सिरोंचा, अनिरुध्द केंद्रे मोकेला, भामरागड, ममता इंदुरकर बोरी, कोरची, जानकीराम पुलगमकर गिताली, मुलचेरा, मोडकु नागोसे अंतरगाव, कुरखेडा, श्रीनिवास पुलुरवार जवेली (म), एटापल्ली, शैलजा गोरेकर बोरी, अहेरी, वर्षा नाकाडे निमगाव, धानोरा, संजय लोणारे भिवापूर, चामोर्शी, अर्चना सांगोळकर विसोरा, देसाईगंज, प्रशांत ठेंगरे कोसबी, आरमोरी आणि राजेंद्र भुरसे मौशीखांब, गडचिरोली यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

माध्यमिक गटातून रवि नारनवरे यांची निवड -
माध्यमिक गटातून रवि नारनवरे जि.प. हायस्कूल, कुरुड, देसाईगंज यांना यंदाचा जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिक्षकांच्या कार्याला मिळणार सन्मान -
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा ग्रामीण तसेच दुर्गम भागात कार्यरत आहेत. या शाळांमध्ये विविध आव्हानांचा सामना करत शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळेत विविध उपक्रम राबविणे, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जाते.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणारा हा गौरव पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरणार असून, जिल्ह्यातील इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा आहे. पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्यास संबंधित शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रेरक उजगरे यांनी केले आहे.





  Print






Related Photos