येहोवा यिरे सोसायटीकडून ८.५९ कोटींची फसवणूक : १,३३२ गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आकर्षक व्याजदर आणि दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, चंद्रपूरने तब्बल १ हजार ३३२ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूरकडून तपास सुरू आहे. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांना अद्याप आपली रक्कम परत मिळालेली नाही, अशा सर्वांना आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणात चंद्रकिशोर नामदेव मांडवकर (वय ५२, रा. आनंदवन चौक, द्वारकानगरी, बोर्डा, ता. वरोरा) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची स्थापना २३ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रपूर येथे करण्यात आली होती. सोसायटीच्या संचालकांनी स्थानिक पातळीवर एजंट, व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून नागरिकांना विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले.
सोसायटीकडून बचत खात्यावर वार्षिक ४ टक्के, मुदत ठेवींवर ९.७५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात येत होते. तसेच २२ महिन्यांसाठी दरमहा १ हजार ३९९ रुपये भरल्यानंतर २४ व्या महिन्यात ८४ हजार १७४ रुपये मिळतील, अशी योजना असल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय ६८ हजार रुपये एकरकमी भरून दोन वर्षांनंतर ८४ हजार १७४ रुपये मिळविण्याची योजना, युवा बचत धन योजना, बचत धन योजना आणि मासिक उत्पन्न योजनांसह विविध आकर्षक योजना गुंतवणूकदारांसमोर मांडण्यात आल्या होत्या.
या योजनांवर विश्वास ठेवून फिर्यादी मांडवकर यांनी ८४ हजार १७४ रुपये गुंतविले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही. याशिवाय इतर १ हजार ३३१ गुंतवणूकदारांचीही मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. फिर्यादीच्या ८४ हजार १७४ रुपयांसह इतर गुंतवणूकदारांचे ८ कोटी ५१ लाख ११ हजार ६६४ रुपये, अशी एकूण ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची रक्कम अफरातफर केल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी सोसायटीच्या संचालक मंडळातील अपेक्षा स्नेहदीप जोव, अतुल सोपन बन्सोड, दुर्गा गौरांग मंडल, वैशाली मधुकर बुच्चे, पल्लवी ऋषी वासेकर, तेजस्विनी आदित्य लोखंडे, प्रीती विनोद भिलकर, वैभव गुरुदेव चौधरी आणि विकास देवराव दुधबळे यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ११७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(५), ३१६(२), ३(५) तसेच एमपीआयडी कायदा १९९९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या रकमेची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या गुंतवणूकदारांना अद्याप त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळालेली नाही, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे दुर्गापूर परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
यावेळी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, पैसे जमा केल्याच्या पावत्या, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि ज्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात रक्कम जमा व्हावी त्या खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या २५ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार गुंतवणूकदारांचे परिशिष्ट-१ मधील विहित नमुन्यातील अर्ज भरून सादर करावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
ही प्रक्रिया फसवणूक झालेल्या सर्व गुंतवणूकदारांची माहिती संकलित करून पुढील कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अतुल कावळे यांनी केले आहे.




Petrol Price




