घोडाझरी ओव्हरफ्लोची प्रतीक्षा लांबली : पर्यटन व्यवसायावरही परिणाम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पूर्व विदर्भातील पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या घोडाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोची प्रतीक्षा यंदा लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने घोडाझरी तलावात सध्या केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. परिणामी, दरवर्षी सांडव्यावरून कोसळणाऱ्या फेसाळ पाण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांचा यंदा हिरमोड होत आहे.
यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडाझरीच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांची होणारी गर्दी कमी झाली असून, त्याचा परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसायावरही जाणवत आहे.
नागभीड-चंद्रपूर महामार्गापासून अवघ्या पाच किलोमीटर आणि नागभीड शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर घोडाझरी तलाव आहे. दाट वनराईने वेढलेला हा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. जंगलातून जाणारा रम्य मार्ग, आजूबाजूचे हिरवेगार वातावरण आणि वाटेत दिसणारे वन्यजीव यामुळे घोडाझरीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
तीन बाजूंनी नैसर्गिक टेकड्यांनी वेढलेल्या या परिसरात इंग्रजांनी १९०५ मध्ये तलावाच्या बांधकामास सुरुवात केली होती. १९२३ मध्ये हा तलाव पूर्णत्वास आला. परिसरातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा तलाव निर्मितीमागील मुख्य उद्देश होता. मात्र, कालांतराने घोडाझरीने सिंचन प्रकल्पाबरोबरच पूर्व विदर्भातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
पावसाळ्यात तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर घोडाझरी परिसराचे निसर्गसौंदर्य अधिक खुलून येते. विशाल जलाशय, तलावाभोवतीची हिरवीगार गर्द वनराई आणि सांडव्यावरून वेगाने कोसळणाऱ्या पाण्याचा मनमोहक नजारा पर्यटकांना आकर्षित करतो. या विहंगम दृश्यांचा आनंद घेण्यासाठी तसेच सांडव्याच्या फेसाळ पाण्यात मनसोक्त भिजण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक घोडाझरीकडे धाव घेतात.
घोडाझरी तलावाला केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण पूर्व विदर्भातील पर्यटकांची पसंती मिळाली आहे. चंद्रपूरसह नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पर्यटक पावसाळ्यात मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. त्यामुळे परिसरातील लहान व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतर पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना मोठा आधार मिळतो.
मात्र, यंदा तलाव ओव्हरफ्लो होण्यास विलंब होत असल्याने पर्यटकांची प्रतीक्षा वाढली आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतरच घोडाझरीचे खरे पावसाळी सौंदर्य अनुभवता येणार आहे.
सध्या घोडाझरी तलावात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून चांगल्या आणि मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
पावसाळी पर्यटनासाठी नैसर्गिक वरदान -
घोडाझरीची भौगोलिक रचना पावसाळी पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल आहे. वर्षभर पर्यटक या ठिकाणी भेट देत असले तरी पावसाळ्यात घोडाझरीचे सौंदर्य वेगळ्याच रूपात पाहायला मिळते.
तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून कोसळणारे पाणी, पावसाने न्हालेली वनराई आणि जलाशयाचे विहंगम दृश्य पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरते. त्यामुळे यंदा पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांना घोडाझरीच्या या निसर्गरम्य रूपासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
News - Chandrapur




Petrol Price




