इंग्रजी साहित्य क्षेत्रात डॉ. प्रियदर्शी मेश्राम यांचे संशोधनपर पुस्तक प्रकाशित


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक जनता महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक, संशोधक आणि लेखक प्रा. डॉ. प्रियदर्शी (पियुष) व्ही. मेश्राम यांच्या संशोधनपर कार्याला आणखी एक मानाचा तुरा लाभला असून, त्यांचे ओ. व्ही. विजयन आणि कादंबरीची कला: एक दृष्टिकोन हे इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. शोधसागर इंटरनॅशनल पब्लिकेशन्स, नवी दिल्ली यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले असून, इंग्रजी साहित्य क्षेत्रात या ग्रंथाची दखल घेतली जात आहे.
भारतीय इंग्रजी साहित्य आणि तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ग्रंथामध्ये प्रख्यात मल्याळी साहित्यिक, व्यंगचित्रकार आणि कम्युनिस्ट विचारवंत ओ. व्ही. विजयन यांच्या कादंबरीलेखनाचा सखोल व चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. विजयन यांच्या साहित्यकृतींमधील कथनशैली, कलात्मक मांडणी, तत्त्वज्ञान, प्रतीकात्मकता, आधुनिकता आणि भारतीय साहित्यविश्वातील योगदानाचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
साहित्य संशोधनातील शिस्तबद्धता, चिकित्सक दृष्टीकोन आणि समकालीन साहित्यविचारांचा प्रभावी संगम या ग्रंथात आढळून येतो. त्यामुळे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी तसेच साहित्य अभ्यासकांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरणार असल्याचे मत साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
प्रा. डॉ. प्रियदर्शी मेश्राम यांनी यापूर्वीही साहित्य, संशोधन आणि सामाजिक विषयांवर सातत्याने लेखन केले असून, विविध शैक्षणिक नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. नव्याने प्रकाशित झालेल्या या ग्रंथामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधनपर वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय इंग्रजी साहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांनी डॉ. मेश्राम यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या ग्रंथलेखनाचे श्रेय डॉ. मेश्राम यांनी त्यांचे वडील तथा ज्येष्ठ रिपाई नेते व्ही. डी. मेश्राम, आई तथा प्राचार्य अनुपमा मेश्राम, संस्थेचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य डॉ. ए. के. महातळे, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत शांताराम पोटदुखे, डॉ. रमा गोळवलकर (पोटदुखे) तसेच आपल्या हितचिंतक आणि मित्रपरिवाराला दिले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




