सिरोंचात १५ गावांना पाण्याचा वेढा : येडसिलीत गावात पुराचे पाणी, २४ तासांत १११.२ मिमी पावसाची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा, अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यांत २८ जुलैच्या रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रेड अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार सिरोंचा तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळला.
परिणामी नद्या व नाले तुडुंब भरून वाहू लागले असून तब्बल १५ गावांना पाण्याचा वेढा पडला. काही गावांना जोडणाऱ्या नाल्यांवरून पाणी वाहिल्याने काही काळ संपर्कही तुटला. मात्र जिल्ह्याच्या इतर भागात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता.
मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २९ जुलै रोजी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. त्यातच आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने विद्यार्थी वर्गाचा आनंद द्विगुणित झाला. घराघरांत सणानिमित्त गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी पावसात चिंब भिजत सुटीचा मनसोक्त आनंद लुटला.
येडसिलीत गावात शिरले पुराचे पाणी -
सिरोंचा तालुक्यातील येडसिली येथे २८ जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यावरील पुलाची उंची अपुरी ठरली. त्यामुळे पुराचे पाणी थेट गावात शिरले. अनेक घरांच्या परिसरात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागला, तर शेतजमिनीही पाण्याखाली गेल्या. या भागात मोठ्या क्षमतेचा आणि उंच पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गपिठा येथे जीव धोक्यात घालून नाला ओलांडला -
मुसळधार पावसामुळे गपिठा परिसरातील नाल्यावरून पाणी वाहत असतानाही काही दुचाकीस्वारांनी जीव धोक्यात घालून नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना वाहत्या पाण्यातून मार्ग काढू नये, असे आवाहन केले आहे.
कोठा-पोचमपल्ली रपटा पाण्याखाली -
गर्कापेठा ग्रामपंचायत अंतर्गत कोठा व पोचमपल्ली येथील रपटा पाण्याखाली गेल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. पॅटिपाका, रेगुंठा, पर्सेवाडा, कर्जेली, मोयाबिनपेटा, झिंगानूर, रमेशगुडम, लिंगापूर, ढोला आणि गर्कापेठा परिसरातील सुमारे १५ ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. रपट्याची उंची वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत डुरके यांनी केली आहे.
सिरोंचात सर्वाधिक पावसाची नोंद -
गेल्या २४ तासांत सिरोंचा तालुक्यात १११.२ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली. अहेरी तालुक्यात ४०.७ मिमी पाऊस झाला.
विविध भागांतील पावसाची नोंद पुढीलप्रमाणे -
पेंटिपाका मंडळ – १७६.५ मिमी
आसरल्ली – ११६.६ मिमी
सिरोंचा – ८०.२ मिमी
बामणी – ७१.६ मिमी
जिमलगट्टा (ता. अहेरी) – ९८.४ मिमी
दरम्यान, गडचिरोली, एटापल्ली, मुलचेरा, कुरखेडा, देसाईगंज, कोरची, आरमोरी आणि धानोरा तालुक्यांत दिवसभर रिपरिप पाऊस सुरू होता. सततच्या सरींमुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली, मात्र मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली नाही.
वाहत्या पाण्यातून जाऊ नका : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -
सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने काही गावांना जोडणाऱ्या मार्गांवरून पाणी वाहत असून वाहतूक तात्पुरती प्रभावित झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू नये तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




