आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची वाटचाल : ता. आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या ५८ लाख रुपयांच्या निधीतून ही इमारत उभारण्यात आली असून, त्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र बाबा आत्राम, तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी निलेश ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अहेरी तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३६ उपकेंद्रांचा समावेश आहे. यापूर्वी अनेक वर्षांपासून हे कार्यालय जीर्ण आणि अपुऱ्या इमारतीतून कार्यरत होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या सुसज्ज इमारतीमुळे आता आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या बैठका, नियोजन, आढावा आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडणार आहे.
या नव्या कार्यालयामुळे अहेरी तालुक्यातील आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळणार असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची ही नवी इमारत आरोग्य विभागासाठी मोठी ताकद ठरेल. या माध्यमातून आरोग्य सेवांचे नियोजन अधिक परिणामकारक होईल आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासकीय आरोग्य सुविधा अधिक वेगाने पोहोचतील, अशी आशा आहे. आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम, अहेरी विधानसभा क्षेत्र
News - Gadchiroli




Petrol Price




