महत्वाच्या बातम्या

 ९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन : तडजोडपात्र प्रकरणे निकाली काढण्याची सुवर्णसंधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने शनिवार, ०९ मे २०२६ रोजी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई दावे, कौटुंबिक वाद (घटस्फोट वगळून), भुसंपादन प्रकरणे, बँकांची कर्ज वसुली प्रकरणे, वीज देयके आणि पाणीपट्टी वाद, तसेच चेक बाऊन्स (कलम १३८) यांसारखी प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली जातील. तसेच न्यायालयात अद्याप दाखल न झालेली परंतु वादात असलेली प्रकरणेही याद्वारे सामोपचाराने सोडवता येतील.

लोकअदालतीमध्ये होणारा निकाल हा अंतिम असतो. यामध्ये दोन्ही पक्षांचा विजय होतो, वेळेची आणि पैशांची बचत होते आणि आपसातील कटुता संपुन संबंध सुधारण्यास मदत होते. विशेष म्हणजे, लोकअदालतीत तडजोड झाल्यास नियमानुसार भरलेली न्यायालयीन फी (Court Fee) संबंधितांना परत मिळते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्हयातील सर्व नागरिक, पक्षकार आणि वकील बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांमध्ये सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos