महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूरच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी दिशा : लवकरच रस्त्यावर धावणार ३० पीएम ई-बसेस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील सार्वजनिक वाहतुकीला नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, पीएम ई-बस सेवा (PM-eBus Sewa) योजनेअंतर्गत शहरासाठी एकूण ५० वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ३० ई-बसेस लवकरच चंद्रपूरकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. या प्रकल्पामुळे शहराला अनेक वर्षांनंतर आधुनिक, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त सिटी बस सेवा उपलब्ध होणार आहे.

चंद्रपूर शहरातील वाढते वायू प्रदूषण, वाहतुकीवरील वाढता ताण आणि नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक परिवहन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने केंद्र सरकारकडे ई-बस प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाने ऑगस्ट २०२३ मध्ये या केंद्र पुरस्कृत योजनेला मंजुरी दिल्यानंतर, तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत चंद्रपूरचा समावेश करून केंद्र सरकारने अखेर ५० ई-बसेस मंजूर केल्या आहेत.

या बससेवेचा लाभ केवळ शहरापुरता मर्यादित राहणार नसून, चंद्रपूरच्या २५ किलोमीटर परिसरातील ग्रामीण भागालाही मिळणार आहे. प्रस्तावित मार्गांमध्ये चंद्रपूर–बल्लारपूर, चंद्रपूर–भद्रावती, चंद्रपूर–घुग्गुस, तसेच बामणी, आरवट-चारवट आणि मूल मार्गावरील चिचपल्ली या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या जागेवर अत्याधुनिक बसस्थानक आणि ई-बसेससाठी चार्जिंग डेपो उभारण्यात येणार आहे. हे बसस्थानक विद्यमान मुख्य बसस्थानकाशी जोडले जाणार असल्याने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.

महानगरपालिकेने या प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात ३० ई-बसेस शहराच्या रस्त्यावर धावतील, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २० बसेस ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत. या बसेसच्या संचालनासाठी केंद्र सरकारकडून प्रति किलोमीटर २५ रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याने प्रवाशांना कमी दरात वातानुकूलित, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

ई-बस प्रकल्पामुळे चंद्रपूर शहरातील सार्वजनिक वाहतुकीत आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रदूषण कमी करण्यासह वाहतुकीची कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे. शहरासह बल्लारपूर, भद्रावती, घुग्गुस आणि परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, लवकरात लवकर बससेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos