महत्वाच्या बातम्या

 हरांबा-उमरी जंगलात पुन्हा टस्कर हत्तीचा वावर


- ३० हत्तींच्या कळपातून वेगळा झालेला नर हत्ती दाखल; शेतकरी धास्तावले, वनविभागाची २४ तास नजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  चंद्रपूर / : काही दिवसांपूर्वी जंगलातून भरकटलेल्या टस्कर हत्तीने दोन निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच, सावली तालुक्यात पुन्हा एकदा टस्कर हत्तीचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. हरांबा-उमरी जंगल परिसरात एका नर टस्कर हत्तीचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, हा टस्कर हत्ती यापूर्वी सावली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या ३० हत्तींच्या कळपातीलच एक सदस्य आहे. हा मुख्य कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने पुढे गेल्यानंतर त्यातून वेगळा झालेला हा नर हत्ती पुन्हा सावली तालुक्यातील जंगल परिसरात दाखल झाला आहे.

सध्या हा टस्कर हरांबा-उमरी परिसरातील घनदाट जंगलात मुक्तसंचार करत असल्याची माहिती आहे. हत्तीचा स्वभाव आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाच्या विशेष पथकाकडून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. हत्तीच्या प्रत्येक हालचालीची माहिती घेण्यासाठी वनकर्मचाऱ्यांकडून २४ तास गस्त घातली जात आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांची वाढली चिंता -
सध्या खरीप हंगामाची कामे वेगाने सुरू आहेत. शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने शेतांमध्ये जात आहेत. अशा परिस्थितीत अचानक हत्ती समोर आल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हरांबा आणि उमरी परिसरातील नागरिकांमध्ये हत्तीच्या वावरामुळे दहशतीचे वातावरण आहे.

मानव-हत्ती संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने परिसरात जनजागृती सुरू केली आहे. नागरिकांनी सतर्क राहून वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हत्ती दिसल्यास वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन -
वनविभागाने शेतकरी आणि ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी शेतात किंवा जंगलाच्या दिशेने जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. जंगल किंवा शेत परिसरात हत्ती अचानक दिसल्यास त्याला दगड मारणे, आरडाओरड करणे किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये.

हत्तीचे दर्शन होताच स्वतःची सुरक्षितता लक्षात घेऊन तातडीने वनविभागाच्या नियंत्रण कक्षाला किंवा स्थानिक वनकर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हत्तीच्या बंदोबस्ताचे वनविभागासमोर आव्हान -
पूर्वीपासूनच वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसमोर आता पुन्हा टस्कर हत्तीचे संकट उभे ठाकले आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता या हत्तीचा बंदोबस्त करण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. दरम्यान, वनविभागाकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos