महत्वाच्या बातम्या

 सामूहिक अत्याचार प्रकरणी पाच आरोपींना अटक : तीन दिवसांची पोलिस कोठडी


- वर्धा लोहमार्ग पोलिसांची तातडीने कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रवासासाठी वर्धा येथील मुख्य रेल्वे स्थानकावर आलेल्या १९ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून वर्धा लोहमार्ग पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विक्रम उर्फ गोलू दिनेशराव खंडाळे (२८ वर्ष, रा. इंदिरानगर, आर्वीनाका, वर्धा), ओम उर्फ दुर्लभ सुनील बावने (१८ वर्ष, रा. मांगपुरा, गोंडप्लाट, वर्धा), शेख मोहसिन उर्फ मुसा शेख कासम कनोजे (२९ वर्ष, रा. गजानन नगर, वर्धा) आणि शेख साहिल शेख शरीफ (३२ वर्ष, रा. महादेवपुरा, वर्धा) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील दोन ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप -
प्राथमिक तपासात संबंधित पाचही जणांनी पीडित युवतीवर शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. प्रवासासाठी युवती वर्धा मुख्य रेल्वे स्थानकावर आली असताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती वर्धा लोहमार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध घेतला आणि पाचही जणांना ताब्यात घेतले.

पोलिस कोठडीदरम्यान तपासाला वेग -
अटक केल्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

या कालावधीत पोलिसांकडून घटनेशी संबंधित विविध बाबींचा तपास करण्यात येत आहे. घटनास्थळांची पाहणी, उपलब्ध पुरावे, पीडितेचा जबाब तसेच प्रत्येक आरोपीची या प्रकरणातील भूमिका याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील विधीसंघर्षित बालकाबाबत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे. प्रकरणाचा पुढील तपास वर्धा लोहमार्ग पोलिसांकडून सुरू असून तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





  Print






Related Photos